||श्री चन्द्रमौलीश्वरौ विजयेताराम्||
२६/०५/२०१०
ठिकाण: माझे ऑफिस, भिवंडी.
तसं पाहता श्रीवर्धन विनायक शेटे नावाच्या अति सामान्य व्यक्तीने हा ब्लॉगचा पसारा मांडवाच का? काय साधणार त्यातून? कोण वाचणार इथे लिहिलेलं? आणी सर्वात महत्वाच म्हणजे, त्या मजकुराची उपयुक्तता ती काय? कारण, एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला, इतर चारचौघांसारखा थोडा बहुत शिकला-सवरलेला आणी एखाद्या सामान्य माणसा सारखा कधी हसत तर कधी कुंथत पण नेटाने जीवनरुपी रहाटगाडा फिरवून एखादं सुंदर मडकं घडवण्याच स्वप्न उराशी बाळगणारा एक क:पदार्थ जीव असं काय सांगू शकेल की ज्याने एखाद्याचा जीवन प्रवाह बदलेल?
प्रश्न अनेक पण प्रत्येकाचं उत्तर मात्र नकारार्थी! तरीही हा फापट पसारा मांडायचा? उत्तर, हो! कारण वयाच्या साधारण दीड वर्षापासून स्मृती मनात आहेत. त्या स्मृती म्हणजे एक व्यक्ती सापेक्ष दृष्टीकोन! एका सामान्य माणसाचा जगात घडणार्या सामान्य, असामान्य घटनांचा साक्षीभूत पण तरीही सापेक्ष अनुभव. थोडक्यात काय तर जग पहाण्याचा माझा चष्मा! आता ह्या चष्म्याच्या काचा जरा ओर्खाडलेल्या असतील, त्यातून दूरचं तितक चांगलं दिसत नसेल देखील कदाचित, पण तरी देखील तो एक चष्माच आहे. कोणातरी अगदी अडलेल्याला अगदी कुठे तरी अगदी आड वळणी थोडासा तरी त्याचा उपयोग व्हावा हा सर्व प्रपंचामागचा उद्देश. अलबत तो कितपत साध्य होईल, हे गुलदस्त्यातच राहिलेलं बरं. मला आपल कोणा अनोळखी व्यक्तीशी हितगुज केल्याचं समाधान. बस! माझ्या अनुभवांतील ज्या काय गोष्टींचा गाठवडा मी इथे उघडणार आहे, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांची नावं त्यांच्या काही लकबी, ह्या मुळे ते वेगळे भासतील, पण त्यांच्या ह्या रंगी बेरंगी स्वभाव छटा जर आपण वेगळ्या केल्या तर त्यातून आपल्याला ह्या व्यक्ती आपल्याच जवळच्या कोणीतरी असल्याचं बहुदा जाणवेल . ह्यातून काही घ्यावास वाटलं तर ते वाचणाऱ्याच मोठेपण! पण काही अयोग्य वाटलं तर नक्कीच माझा कमकुवतपणा. असो. आता अथ श्री. श्रीवर्धन पुराणं, असं म्हणण्यास हरकत नसावी!
No comments:
Post a Comment